Ad will apear here
Next
दुर्लक्षित विषयाचा अमूल्य ठेवा
‘पश्चिम महाराष्ट्रातील महिलांचे पारंपरिक देशी खेळ – प्राचीनत्व व महत्त्व’ या नावाचा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महिलांचे खेळ, फुगडी, भातुकली, नृत्यगीते, हादगा-भोंडला अशा कित्येक प्रकारच्या पारंपरिक गोष्टींचे संकलन या ग्रंथात करण्यात आले आहे. आपल्या संस्कृतीचा ठेवा जपण्याच्या आणि रसिकांपर्यंत एकत्रितपणे नेण्याच्या दृष्टीने खूप मोलाचे कार्य या ग्रंथामुळे होणार आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथाचे संपादकीय प्रकाशित करत आहोत.
....................



प्राचीन काळी मुली किंवा स्त्रियांसाठी म्हणून असे काही खेळ होते का, आणि तसे ते असल्यास त्यांची नेमकी सुरुवात कधी झाली, ते खेळ कसे विकसित झाले..? यांसारखे अनेक प्रश्न अनेकदा पडतात. या प्रश्नांची नेमकी उत्तरे देता येणे कठीण आहे. खेळ हे मानवी जीवनाचे एक सहज अंग आहे. खेळ बौद्धिक-शारीरिक कौशल्यांचा विकास साधण्यास उपयुक्त असतात. शरीराचे आणि मनाचे आरोग्य वृद्धिंगत करणारे असतात; पण तो खेळांचा नैसर्गिक परिणाम आहे. मुलींचे-स्त्रियांचे असोत, की मुलांचे-पुरुषांचे खेळ, रोजच्या कष्टाच्या आयुष्यातून विरंगुळा मिळविण्यासाठी त्यांना महत्त्व प्राप्त झाले, हे उघड आहे. 

शेतीपूर्व जीवनपद्धतीत मानवाचे जीवन शिकार आणि अन्न गोळा करणे यांवर अवलंबून होते. शिकारीवर जाणे किंवा निसर्गत: उपलब्ध असलेले अन्न गोळा करून आणणे, या क्रिया एखाद्या मोहिमेसारख्या असत. त्यासाठी समूहाने एकत्रितपणे प्रयत्न करून, ती मोहीम पार पाडण्याची गरज असे. अशा मोहिमांमध्ये समूहाने केवळ एकत्र असण्यालाच नव्हे, तर त्या समूहामध्ये एकतानता प्रस्थापित होण्यालाही खूप महत्त्व होते. गुहाचित्रांमध्ये असलेल्या, शिकार करणे किंवा मधासारखे अन्न गोळा करणे यांसारख्या चित्रांमधूनमधून समूहाची एकतानता प्रत्ययाला येते. तत्कालीन मानवी समाजाला अनुभव आणि निरीक्षण यांद्वारे प्राप्त झालेले निसर्ग आणि परिसराच्या ज्ञानाचे भांडार जणू काही या गुहाचित्रांमध्ये साठलेले आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते ज्ञान हस्तांतरित करण्याचे एक प्रभावी साधन म्हणूनही या चित्रांकडे पाहता येईल. ही चित्रे पाहत असताना मनात सहज एक विचार येऊन जातो, की आदिम मानव समूह अन्न मिळविण्याच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी त्या मोहिमेचा पूर्वसराव तर करत नसतील? त्यासाठी केल्या गेलेल्या शिस्तबद्ध सामूहिक हालचाली हाच तर खेळाचा उगम नसेल? 

शेती संस्कृतीच्या आधारे स्थिरावलेल्या मानवी समाजांमध्ये सण-उत्सव आणि ते साजरे करण्याच्या अनुषंगाने खेळांचा विकास झपाट्याने झाला असावा. राजसंस्थेच्या आणि धर्मसंस्थेच्या उदयाच्या बरोबरीने साहसी, मैदानी खेळ आणि लढाऊ कौशल्ये यांना एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. खेळांमध्ये हळूहळू नित्य-नैमित्तिक, मैदानी-बैठे खेळ, श्रीमंतीचे-गरिबांचे अशी वर्गवारीही तयार झाली. परंतु उपलब्ध पुरातत्त्वीय आणि साहित्यिक पुराव्याच्या आधारे अतिप्राचीन काळी स्त्रियांचे काही स्वतंत्र खेळ होते किंवा नाही, यावर फारसा प्रकाश पडत नाही. मध्ययुगामध्ये मात्र स्त्रिया, विशेषत: राजस्त्रियांच्या जलक्रीडा, उद्यानविहार इत्यादींचे उल्लेख सापडतात. 

पट आणि सोंगट्यांच्या आधारे खेळले जाणारे विविध खेळ इजिप्त, मेसोपोटमिया, चीन आणि हडप्पा या चारही आद्य नगरी संस्कृतींमध्ये खेळले जात होते. त्यांचे पुरातत्त्वीय पुरावेही उपलब्ध आहेत. द्यूताचे खेळण्याचे आमंत्रण नाकारायचे नाही या मानसिकतेपायी युधिष्ठिराने द्यूत खेळण्यास संमती दिली आणि महाभारत घडले. याच द्यूताचा उल्लेख नंतरच्या काळात सारीपाट, चौपर अशा नावांनी केला गेला.

श्रीमंत स्त्रियांमध्ये सारीपाटाचा खेळ लोकप्रिय असावा. स्त्रिया त्यात निपुण असाव्यात. फासे फेकून अचूक दान टाकण्यातले नैपुण्य या खेळातला डाव जिंकण्यासाठी अत्यंत आवश्यक असे. पार्वतीकडे ते होते. त्याचमुळे शिवाबरोबर खेळताना पार्वतीचा विजय ठरलेला असे. माझी आजी एक गीत नेहमी गुणगुणत असे : 

गौरी म्हणे शंकरा चला हो खेळ खेळू आपण या स्थळी
म्यां सारीपाट मांडला तरुतळी
मध्येच येऊनि नारदमुनीने 
लावून दिधली कळी
म्हणे तू धन्य कुशल कामिनी
उमे तू धन्य कुशल कामिनी
प्रथम डावी जिंकिले शिवाचे आसन व्याघ्रांबर 
द्वितीया घेत शशी सुंदर 
कंथा, झोळी, त्रिशूल, डमरू, हरी गिरिजा त्यावर 
द्या म्हणे तुम्ही मला सत्वर
भोळा शंकर कपटबळाने आणिला त्वां जिंकूनी
उमे तू धन्य कुशल कामिनी ॥धृ॥

(*हरी गिरिजा = गिरिजेचे हरण केले  म्हणजेच गंगेला जिंकून घेतले)

‘भिल्लीण’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या गीतात सारीपाटात सर्व काही हरल्यामुळे शंकर रागावून वनात जातात. त्यांची समजूत काढून त्यांना परत आणण्यासाठी भिल्लिणीचे रूप घेऊन पार्वती त्यांच्या मागे जाते ही कथा सांगितली जाते. तमिळनाडूतील थयम किंवा महाराष्ट्रातील काचकवड्या हा अजूनही खेळला जाणारा खेळ या सारीपाटाचेच गरीब, परंतु सख्खे भावंड आहे. चावांग, चौकाबारा, अष्टेकष्टे अशी काचकवडी या खेळाची इतर नावे आहेत. एखादा अपवाद सोडल्यास, मुली आणि स्त्रियाच तो प्रामुख्याने खेळतात, हेही विशेष! असे म्हणतात, की सारीपाटाचा म्हणजे चौपराचा खेळ प्राचीन चीनमध्ये इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात पोहोचला आणि ‘शु-पु’ या नावाने तो तिथे खेळला जाऊ लागला. 

स्त्रियांच्या खेळाबद्दल बोलत असताना त्यांच्या सामाजिक दुय्यमतेचा, त्यांच्या घुसमटलेपणाचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे. त्या घुसमटलेपणातून थोडेसे मोकळे होण्यासाठी स्त्रियांचे खेळ विकसित झाले किंवा ते विशिष्ट हेतूने सुरू केले गेले, असा एक सूर नेहमी उमटताना दिसतो. त्यात मुळीच तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही. खेळांच्या बरोबरीने गुंफल्या जाणाऱ्या गीतांमधून मोकळा श्वास घेण्याची, जीवनाचा बंधमुक्त आनंद साजरा करण्याची स्त्री-मनाची ऊर्मी त्या गीतांमधून जाणवल्याखेरीज राहात नाही. परंतु याची एक दुसरी बाजूही आहे. तीही सजगतेने पाहण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. 

स्त्री स्वभावत:च हळवी आणि कणखरही आहे. जीवनानुभवाला सामोरे जात असताना, तिचे हळवेपण तिला अत्यंत संवेदनशील, सूक्ष्म तपशीलांबाबत बारीक नजर असलेली, सुख आणि दु:ख दोहोंनाही तीव्र प्रतिक्रियेसह भिडणारी, अशी घडवतो. त्याचवेळेस तिचा कणखरपणा, तो हळवेपणा बाजूला ठेवून, परिस्थितीवर मात करून, वाट्याला आलेल्या सुख-दु:खांना ओटीत घेऊन नव्या हुंकारांना जन्म देत, त्या जीवनानुभवाची परिमाणे विस्तारायला, उंचावयाला बळ देतो. स्त्रीच्या मनाचे हे अनोखेपण तिला अत्यंत नाकारात्मक परिस्थितीही सकारात्मतेकडे नेते. स्त्रियांच्या सकारात्मकतेकडून, त्यांच्या सहज व्यक्त होण्यातून स्त्रियांच्या खेळांचा, गीतांचा जन्म झालेला असतो. स्त्रियांकडे उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य उपजतच असते, असे म्हटले जाते. हाताशी सहज उपलब्ध असणारी साधने घेऊन किंवा साधनांशिवाय स्त्रियांचे खेळ खेळले जाऊ शकतात. शून्यातून, साधनांविना बाह्य व्यवहार आणि आंतरिक भावनांची घातलेली सुखदायक गुंफण स्त्रियांच्या पारंपरिक खेळांमध्ये अनुभवायला मिळते. स्त्रियांचे व्यवस्थापन कौशल्यच अशा तऱ्हेने सिद्ध झालेले दिसते म्हणूनच स्त्रियांच्या पारंपरिक खेळाचा आढावा घेताना केवळ त्यांच्या सामाजिक दुय्यमतेचा विचार न करता तिच्या सर्जनशीलतेचा विचार अधिक व्हायला हवा. 

महिलांचे पारंपरिक खेळ हा तसा दुर्लक्षित असलेलाच विषय! तो विषय मध्यवर्ती ठेवून त्यावर एखादी परिषद आयोजित केली जावी आणि त्या परिषदेत सादर झालेल्या लेखांचे प्रकाशन करण्याचे कामही तळमळीने आणि आस्थेने पूर्ण केले जावे, हा योग अपूर्वच म्हटला पाहिजे. अर्थात याचे सर्व श्रेय भारत इतिहास संकलक समितीचे स्व. डॉ. चिं. ना पुरचुरे, डॉ. क. कृ. गीरसागर अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आहे. परिषदेत सहभागी झालेल्या लेखकांनी त्यांच्या लेखांमधून एक अमूल्य ठेवा आपल्या हातात सुपूर्द केला. तो वाचकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावा यासाठी अनेकांनी हातभार लावला. प्रतिभाताई धडफळे आणि शिल्पा वाडेकर या दोघींनी कार्यकारी संपादक या नात्याने केलेल्या कामाची तर विशेष नोंद घ्यायला हवी. 

स्त्रियांच्या पारंपरिक खेळांचा विचार समग्रतेने मांडण्याचा प्रयत्न करणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. एका दुर्लक्षित विषयाच्या अमूल्य ठेव्याला गवसणी घालण्याच्या प्रयत्नांची ही फक्त सुरुवात आहे. 

- डॉ. शुभांगना अत्रे 
संपर्क : ९८५०५ ७०७५९

(लेखिका ‘पश्चिम महाराष्ट्रातील महिलांचे पारंपरिक देशी खेळ – प्राचीनत्व व महत्त्व’ या ग्रंथाच्या संपादक आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZDIBB
Similar Posts
...आणि पुस्तक उलगडत जातं लोकांना वाचतं करण्यासाठी जे विविध उपक्रम राबवले जातात, त्यात ठिकठिकाणच्या आकाशवाणी केंद्रांच्या उपक्रमांचाही आवर्जून समावेश करावा लागेल. पुणे आकाशवाणी केंद्रा वर ‘कथांतर’सारख्या कार्यक्रमातून पुस्तकांचं अभिवाचन केलं जातं किंवा नभोनाट्य स्वरूपात सादरीकरण केलं जातं. पुणे आकाशवाणी केंद्राचाच आणखी एक उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे पुस्तक परिचयाचा
पुस्तकांचं माध्यमांतर पुस्तकं ही केवळ प्रत्यक्ष पुस्तकं न राहता आता ई-बुक, ऑडिओ बुक, अभिवाचन अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये येऊ लागली आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे हे शक्य झालं आहे. त्यामुळे आशय स्थळकाळाची बंधनं तोडून अधिकाधिक लोकांपर्यंत, वेगवेगळ्या रूपांत, पोहोचू लागला आहे. माध्यमांतराची हीच ताकद आहे.
जावे पुस्तकांच्या गावा... भाषेचे संवर्धन ही खरे तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या उपायययोजना राबवल्या जात आहेत, ही आनंदाचीच बाब आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या महाराष्ट्रदिनी महाबळेश्वरजवळच्या भिलार गावात ‘पुस्तकांचं गाव’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ओळख... ...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने आपल्याला आवडणारी जुनी व दुर्मीळ पुस्तके कुठे नुसती बघायला मिळाली, तरी होणारा आनंद अवर्णनीय असतो. हाच आनंद परवडेल अशा स्वस्त दरांत कुणी विकत देत असेल तर? किंवा अशी पुस्तके विकणारे पुस्तक विक्रेते आपल्याला भेटले तर तो दुग्धशर्करा योगच! वसंत यशवंत आठवले ऊर्फ आठवले काका हे त्यातीलच एक प्रसिद्ध नाव. दर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language